Saturday, May 24, 2025

नाते संबंध अनुभवताना अस्वस्थ करणारे

नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तीन सशक्त अभिनेत्री असलेल्या तीन शक्तींनी असेन मी..नाटक अतिशय परिणामकारक सिद्ध करून हा अनुभव दिला.. 


आई..मावशी आणि मुलगी..या तीन महिलांच्या आयुष्यातील नाते संबंध अनुभवताना अस्वस्थ करणारी


मराठी रंगभूमीवरील एक कलाकृती अनुभवली..आणि  आम्ही बरेच दिवसानंतर आयुष्याकडे अधिक गंभीर बनून गेलो.. नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तीन सशक्त अभिनेत्री असलेल्या तीन शक्तींनी नाटक अतिशय परिणामकारक सिद्ध करून हा अनुभव दिला.. आणि त्या नाटकाविषयी विचार करतच नाट्यगृहाबाहेर आलो..

संदेश कुलकर्णी यांनी लिहलेले नाटक .. असेन मी..नसेन मी.. व्यावसायिक रंगभूमीवर झालेल्या स्पर्धेत नाटकाने आठ पुरस्कार मिळवले आहे.. उत्तम दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य..आणि तिन्ही कलाकारांना गौरविण्यात आले आहे..हे नाटक आम्ही पाहिले याचा पुण्यात अभिमान वाटतो.


स्त्रियांच्या तीन पिढ्या..त्यांच्या आयुष्यात तुम्हाला घेऊन जातात.. त्यांचे आयुष्य..त्यातल्या घटना सांगून.. स्त्रीत्वाचे..आणि माणसांचे अनेक नमुने एकाच जागी बसून तुम्हाला जगभर फिरवून आणतात..

सुखवस्तू कुटुंबातील तीन पिढ्यांचे आयुष्य उलगडून सांगताना आधुनिक जीवनातील विविध नात्यांना उलगडून सांगत.. दुःखे पेलण्याची ताकदही या नाटकाने.. आहेरे..आणि नाहीरे यांच्या दृष्टीने मांडली आहेत.

केवळ शब्दातून स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या गंभीर पण अनेक विषयांना मनात घर करून देणाऱ्या इथे घडवून तुम्ही त्यांच्या आयुष्यात डोकावता आणि गंभीर होत जाता..

आई...आणि ताई.. नीना कुलकर्णी..मावशी वर्षा..आणि    शुभांगी गोखले आणि गौरी.. ही मुलगी.. अमृता सुभाष..

आईला आता विस्मरण होत असते..

तिला सोडियमची टेस्ट करण्याची मावशी म्हणजे वर्षा गौरीला सांगते..

तिघांच्या आयुष्यात ..एकीचा नवरा.. दारूच्या आहारी जाऊन गेला..तर दुसरी वर्षा आजाराने सतत व्हील चेअरवर..त्यांचा नवरा भोळसट..पण वर्षा बडबडी..मनमोकळी.. गौरी. कर्तृत्ववान ..करारी.. प्रेम विवाह झालाय पण दोघांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतलाय..


आई.. सतत पोट साफ होत नसल्याची तक्रार असणारी.. त्यामुळे आपल्याला हवी ती औषधे घेऊन .. सतत अपसेट असणारी..पतीला जगायचे होते..पण सर्वांच्या सांगण्यानुसार त्यांना जगाचा निरोप घेण्यासाठी कृत्रिम श्वास बंद करून जगाचा निरोप घेण्यासाठी उद्युक्त केले..म्हणून ते सतत भासमय दिसत असतात..म्हणून घाबरणारी

आई..

त्यातून विस्मरणाचा आजार बळावत चाललेला..

मुलीच्या.. जावयाच्या..संसारात होत असणारे बदल..आणि मुलगा रोहन यांच्याविषयी असलेले ममत्व.. त्यातून मुलगी मोठी..ताई म्हणून. तिला मिळालेले मोठेपण.. त्यातून खान भाऊ आणि मोठी बहीण यांच्यातील तणाव..

आई आणि मावशी यांचे केवळ फोनवरील संभाषणातून  तयार झालेले  नाते..त्यांचे एकमेकींशी असलेले भावबंध..

मावशीचा अचानक झालेला मृत्यू..

गौरीचे आईविषयी प्रेम.. त्याचे आईला वाटणारे आपल्यावर पाळत ठेवल्यासारखे वाटणे.. आणि त्यातच मदतनीस होऊन घरात आलेली सुनंदा ताई..आईसाठी कायम लक्ष देणारी कामाची आवश्यकता असणारी ही घरच्या परिस्थितीवर मात करून हसत खेळत असलेली..ही सुनंदा..


बालपणीचा काळ सुखाचा ..म्हणून ते दिवस आठवत होणारे बहिणींचे फोनवरचे संभाषण..आणि तू गेल्यावर तिच्या इच्छेनुसार तपासण्या करणारी आई..

मुलीने कितीही केले तरी मुलाच्या सगळ्या गोष्टी मानणारी आई..

आजकाल एकाकी होत जाणारी नवी पिढी..आणि मुले परदेशात..स्त्रियांचे एकटे रहाणे.. सतत काहीतरी होत असल्याचा दावा असणारी माणसे..

सगळे असले तरी विसरभोळे पणाचा आजार वाढणारी घरे..वाढत असलेला नात्यांतील दुरावा.. आता सगळे आपल्याला एकट्याला भोगावे लागणार असल्याची खंत..किती किती गोष्टी..असेन मी..मधून उलगडत जातात..


प्रेक्षकांना गंभीर बनवितात.. नवीन काळाच्या दिसणाऱ्या गोष्टी संदेश कुलकर्णी यांच्या नाटकातून मनावर गोंदवल्या जातात..

भावनाविश्व दाखविणारे प्रसंग..त्यासाठी आजची भाषा.. आयुष्यातली कृतिमता..सारेच यात आहे..

आणि गोष्ट सांगताना नीना कुलकर्णी..शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांनी रंगमंचावर साकारलेल्या भूमिका.. सारेच जागरूकतेने ..लक्षपूर्वक ऐकले जाते..पाहिले जाते..

अतिशय सुंदर अश्या भूमिका पहाण्याची संधी ही नाटक देते.. गंभीर असणारे नाटक सुनंदाच्या प्रवेशामुळे थोडीतरी निवांत करते..शुभांगी गोखले यांच्या दोन भिन्न प्रकृतीच्या भूमिका अधिक ठळकपणे लक्षात राहतात..

काळाचा बदल..आणि त्याला सामोरे जाताना होणारे बहिणींचे फोनवरचे संभाषण..सारेच मनात लक्षात राहते..

तिन्ही अभिनेत्रींनी आपल्या भूमिका मनस्वीपणे 

साकारल्या आहेत.. वास्तव राहून..त्यांची सहज होत असलेला वावर..हेच तर नाटकाचे देखणेपण आहे.. अभिनय नव्हेच तो आहे उत्तम भास..

वाचिक..शारीरिक आणि अंगीक अभिनयाचा आदर्श वाटावा अशा भूमिका...सारेच ..!


दिग्दर्शनात असणारे बारकावे..नेमके दाखविता येत नाहीत..त्यासाठी नाटकच अनुभवावे लागेल.. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य , प्रकाश..साकेत कानिटकर यांचे संगीत.. श्वेता बापट यांची वेशभूषा.. साऱ्यांमुळे नाटक ठसठशीत समोर येते.


आजच्या स्त्रियांचे मानसिक आरोग्य ..त्यांची आतून होणारी कुचंबणा संदेश कुलकर्णी यांच्या नाटकातून अधिक गडद होत मनात घर करून राहते..

अमृता सुभाष यांचे मनापासून अभिनंदन..

असा गंभीर विषय धाडसाने मांडण्याचे साहस त्यांनी केले..मंचावर आणले आणि एक संदेश दिला आहे..अमृता आणि संदेश तुमचे कौतुक..


#असेनमी #amrutasubhash #sandeshkulkarni #नवेनाटक


_ सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

Wednesday, May 21, 2025

संपूर्ण दीपरामायण हा कलियुगातील एक चमत्कारच .. डॉ. सदानंद मोरे



संपूर्ण दीपरामायण लिहिणे हा कलियुगातील एक चमत्कारच म्हणावा इतकी महत्वाची घटना मानावी लागेल..इतका निरागस व्यक्तीमत्व लाभलेला माणूस पुराणकाळातील वाटावे असे महाकाव्य लिहिल असे वाटत नव्हते...या इति कर्तव्याची पूर्ती होण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता असे वाटते. असे ग्रंथ आजकाल कुणी प्रकाशित करणारा नाही..ते सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले हाही एक चमत्कार असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त करून या ओवीबद्ध ग्रंथाची महती स्पष्ट केली.
संगणकाच्या १ लाख ६३ हजार ५०३ शब्दांचा उपयोग करून आणि १०, २२६ ओव्या रचून ४२६ पृष्ठांचे स्वालिखित संपूर्ण दीप रामायण १० मार्च २०२३ रोजी दीपक करंदीकर यांनी पूर्ण केलेला हा ग्रंथ सकाळ
प्रकाशनाच्या वतीने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढाकाराने २० एप्रिल २५ रोजी डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि आनंद माडगूळकर आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रकाशित झाला.. यावेळी डॉ. मोरे बोलत होते.



महिपती सारख्या काळात जाऊन त्यांनी ते ओवीबद्ध स्वरूपात लिहिले हे आणखी एक या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. लुप्तप्राय होत असलेल्या प्राचीन छंदामध्ये दीपक करंदीकर यांनी हा ग्रंथ लिहिला ही आजच्या साहित्य इतिहासातील मोठी अभिमानाची गोष्ट आहे..असेही मत डॉ. मोरे यांनी यावेळी अधोरेखित केली.
दीपक करंदीकर यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास केल्याचे या पुस्तकातील ओव्या वाचताना जाणवते..रामायणातील उपकथानके त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे ओव्यांमधून कथन केली आहेत..प्राथमिक शिक्षण घेतलेल्या माणसाला अतिशय सोपी वाटावी अशी भाषा वापरून त्यांनी अतिशय व्यासंगी असा ग्रंथ लिहिला असल्याचे गदिमा पुत्र आनंद माडगूळकर सांगतात. हे त्यांच्या हातून घडले हे गेल्या जन्मीचे
पुण्यच म्हणावे लागेल.



अनेक घरात या ग्रंथांची नियमित पारायणे होऊन हा ग्रंथ सिद्ध होईल याची माडगूळकर यांना खात्री वाटते.



दीपक करंदीकर यांच्या उत्तम गझल रचनांना उल्लेख करून प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांचा हा प्रतिभावंत म्हणून झालेला प्रवास म्हणजे गझले कडून महाकाव्याकडे झालेला प्रतिभेचा प्रवास महत्वाचा असल्याचे ते आवर्जून सांगतात.
श्रीरामाचे आपल्या समाजात किती महत्व आहे यांचे वर्णन करून जोशी यांनी आपल्या सांस्कृतिक संचिताचे नवसर्जन करन करून अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण करणे यासाठी सुद्धा एका प्रकारची प्रतिभा लागते..ती दीपक करंदीकर यांच्याकडे होती. जशी गदिमा यांनी चित्रपट गीते.. सांगीतिका यापद्धतीने ते गीतरामायणा पर्यंत येऊन पोचले तसा दीपक करंदीकर यांचा प्रवास देखील कविता, गझल, गद्यलेखन ते दीप रामायण असा प्रवास झाल्याचे मिलिंद जोशी सांगतात. भाषेचे सौंदर्य, कल्पनेचे वैभव आणि उदात्त विचार या तीन गोष्टी एकत्र आल्या तर त्याच्या रसायनातून किती उत्तम कलाकृती निर्माण होते याचे दीप रामायण हे उदाहरण असल्याचे मत जोशी मांडतात.



यावेळी साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्ष
सुनीताराजे पवार आणि आमदार हेमंत रासने यांनीही करंदीकर यांच्या विषयी आपले विचार बोलून दाखविले..
कविवर्य सुरेश भट यांचे शिष्य दीपक करंदीकर यांनी रामायणातील कथानकावरून ओवीबद्ध रचलेले दीपरामायण या महाकाव्याचे प्रकाशन ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मंगळवारी मसापच्या सभागृहात करण्यात आले.
दीपक करंदीकर यांच्या निधनानंतर सुमारे वर्षभराने ह्या महाकाव्याचे प्रकाशन सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द केले गेले. कार्यक्रमात मसापचा मोठा वाटा होता. प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष होते मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रमुख पाहुणे म्हणून आनंद माडगुळकर उपस्थित होते. कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने कार्यक्रमासाठी खास हजर होते. तसेच मसापच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अमृता देसरडा.. यांनी सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रास्ताविक केले.
सकाळ प्रकाशनाचे..आशुतोष रामगिर,
दीपक करंदीकर यांचे कुटुंबीय आणि करंदीकर प्रेमी..आणि साहित्यिक प्रेमी हजर होते..



मृणालिनी कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले तर कुमार करंदीकर आणि विनिता दात्ये यांनी आरंभी दीप रामायणातील काही ओव्यांचे सादरीकरण केले.








- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Monday, May 19, 2025

आयुष्य उसवताना...!



अगदी बालपणापासून पहातो आहे..तिचे आयुष्य.. लक्षात रहात नाही..म्हणून मार खाणे.. शाळेत जाणे ..एक केवळ उपचार..
कारण मेंदूची वाढ पुरती झाली नाही..असा आई वडिलांचा समज..
मग ही काहीच उपयोगी ठरण्यासाठी योग्य नसल्याची सतत जाणीव..मग त्याचा परिणाम म्हणून तिच्यावर होत असलेले मानसिक छळ ..शारीरिक अत्याचार.. पण त्या जीवाची वेदना कुणीच लक्षात घेतली नाही..
वडिलांनी आपल्या मुलीला ओळखले ..तिच्यात मुळातच हुशारी नाही.. तिला कळत नाही..म्हणून समजून सांगण्यासारखे प्रयत्न करत होते..पण आईचा हट्ट..तिने किमान लिहायला वाचायला शिकावे.. किमान तिला आकडे..समजावे..यासाठी अगदी टोकाचे केलेले प्रयत्न..सारे डोळ्यासमोर येते.. पण तिच्यात काही सुधारणा होत नाही..हे दिसत होते..
आईची अपेक्षा किमान तिला अक्षर ओळख मिळावी..स्वतःचे नाव लिहिता यावे..आपली स्वाक्षरी करता यावी.. जगात साक्षर होऊन..आपले आयुष्य स्वाभिमानाने जगता यावे..
मेंदूवर जास्त ताण आला तर फिट येते..म्हणून पुढे पुढे..सारे केलेले प्रयत्न परतून माघारी घेतले गेले..
शाळेतून नावच काढून टाकले..अखेरीस ती निरक्षर राहिली...पण आयुष्याच्या एकाकी लढतीत तीच खरी साक्षर असल्यासारखे वाटे..
माझ्यापेक्षा मोठी असलेल्या या बहिणीला घर कामात मदत करण्यासाठी आई अनेक कामात मदतीला घेऊ लागे..पण त्यातही ती कमी पडे..
वडिलांची पिठाची गिरणी होती..हळूहळू तीही उत्पन्न देत नव्हती.. धान्य दळण्यास कमी ग्राहक येऊ लागले..मग आईनेच ..ती जिथे पोळी करण्याचे काम घेतले ..त्या परांजपे वाड्यात तिने अनेकांना सांगून बहिणीवर त्यांच्या घरचे
दळण गिरणीतून नेणे आणि त्यांच्या घरी पोचविण्याचे काम बहिणीवर सोपवले..
त्यात वेळ जाई आणि चार पैसे वडिलांना मिळतील.
कधीतरी वडील आमच्या मूळ गावी जाऊन येथील चिंचेच्या झाडाच्या चिंचा उतरवून त्याची पोती घरी आणत.. मग चिंचा फोडून त्यातले चिंचुके काढण्याचे कामी बहिणीला मदतीला घेत.. अर्थात हे काम आम्ही सर्वच जण करत असू..
वय वाढले तशी तिची चिंता वाढत गेली..त्यातूनच तिचा विवाह करावा हा विचार केला गेला..निदान त्यामुळे तिच्या वागण्यात फरक होईल ही आशा होती..
एकदाचे कराड येथील स्थळ पाहिले..लग्न नक्की झाले.. कराड जवळ पाली गावी लग्नाचा घाट घातला गेला..
पण पाली मध्ये लग्नाच्या आदल्या रात्रीचं वास्तव समोर आलं..वडिलांना अचानक भीती वाटू लागली..आम्ही घाबरलो..पण वेळ हेच औषध..
दुसऱ्या दिवशी लग्न विधी पार पडला..
पण पंधरा दिवसातच तिचे तिथे नांदणे कठीण झाले.. तिला मारहाण होऊ लागली..अखेर वडील तिला सातारला घरी घेऊन आले..
तेंव्हा ती एक आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याची जाणीव आई वडिलांना झाली..
मोठी बहीण..आईही तिला धसमुसळे करून सारखे डिवचत राहिले..
बहीण काहीच व्यक्त होत नसे.. ढिम्म
बसत असे.. तिच्या नजरेत थोडा तिरळेपणा दिसत होता..
आता हिचे कसे होणार..हा प्रश्न सतावत होता..तीही .. मोले घातले रडाया..सारखे बोलणी खाऊन तीही कोडग्यासारखे वागत होती.
सारे होऊनही तिच्यात फार फरक पडत नसे..
खरेच त्यावेळी तिला काय वाटत असेल..आपण फक्त कामासाठी आहोत.. आपल्या आयुष्यात पुढे काय असेल..अंधार..किती दुःख सहन करत असेल ती जीव..आता त्या घटनांची आठवण झाली की मनात चीर पडते..
सतत सगळ्या घराला वाटे हिचे पुढे कसे होणार..!
पण खरे सांगू .. प्रत्येकाचा मार्ग त्याने आखून दिलेला असतो..आपण फक्त पुढे सरकत रहायचे..हेच खरे..!
माझे शालेय शिक्षण होत राहिले..मोठ्या बहिणीचे
शिक्षण..नोकरी..मग लग्न..सारे झाले..मग या माझ्या पाठी ..आणि माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणीचे आयुष्य केवळ आणि केवळ कष्ट ..यातून तिची कशी सुटका होणार...
पण वेळ यावी लागते..तशी ती आली..
मी पुण्यात नोकरीसाठी सातारा सोडून ..खरे म्हणजे आई वडील..आणि ती बहीण ..यांना त्यांच्या त्याच त्याच आयुष्यात सोडून माझे करियर घडविण्यासाठी पुण्यात तरुण भारत... या दैनिकात रुजू झालो..आणि..
मला पुण्यातील महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची माहिती झाली..निराधार स्त्रीयांना तिथे आश्रय मिळतो..असे कळले..मी प्रयत्न केला..






आई वडील बहिणीला घेऊन स्वारगेट जवळील एका नातेवाईकाकडे उतरले..
आम्ही तिघेही हिंगण्यात गेलो..तिथे असणाऱ्या त्यावेळच्या वस्तीगृहाच्या प्रमुख देशमुख बाईंशी बोललो..त्यांना अर्ज दिला..
बहिणाबाबत सारे काही सांगितले..आई .. विशेषतः वडील अगदीच डोळ्यात पाणी आणून आमच्या मुलीला तुमच्या संस्थेत दाखल करून घ्या ..! अशी वारंवार विनवणी करत होते..
तो प्रसंग मला आजही आठवतो..आणि मन गलबलते..!
जिथे आम्ही उतरलो होतो..तिथला फोन नंबर दिला होता..संस्थेतून फोनची आतुरतेने वाट पहात होतो..तीन दिवसांच्या नंतर बहिणीला संस्थेने प्रवेश दिल्याचे सांगितले.. साऱ्यांचे.. विशेषतः वडिलांचे चित्त शांत झाले..आता त्यांना हिचे आयुष्य काहीना काही रांगेला लागेल असे वाटले..
ती दिवस आठवतो..आम्ही सारे तिला घेऊन संस्थेत गेलो..आमची ही मुलगी.. तिला बुद्धी कमी आहे. पण ती प्रामाणिक आहे..जे सांगाल ते काम करेल..कष्टाला मागे पुढे पाहणार नाही..तुम्ही कुठलेही काम द्या..ती करेल..अशी विनवणी करत होतो..संस्थेत ती दाखल झाली..तिला संस्थेच्या भल्या मोठ्या स्वयंपाक घरात मदतनीस म्हणून रुजू करून घेतले..आणि चक्क महिना ५० रुपये पगारही सुरू झाला.. तिचे आयुष्य मार्गी लागल्याचे समाधान आई वडिलांना लाभले..त्यांचे मन आतून सुखावले..शांत झाले.. त्यातही मी पुण्यात होतो..मधून मधून जात होतो..आई वडीलही सातारवरून येऊन तिला भेटत होते..




जे पडेल ते काम करत बहीण संस्थेत रुळत होती..
राहणे..भोजन..शिवाय..कपडे..चादर..सारे काही मिळत होते..बरेच दिवस तिला संस्थेच्या स्वयंपाक घरातील महिला वर्ग आवडू लागला..तिने नाव कमावले..मी काय करतो पेक्षा मीनाचा भाऊ म्हणून मलाही तिथे आदर मिळत गेला..तिने मेहनत केली..कधी...कधी तिला वाईट वाटत असे..पण काय करणार..हेच आपले आयुष्य आहे..हेच आपले जग हे तिनेही मान्य केले..
तिच्या प्रेमळ स्वभावाने तिने तिथले सहकारी आपलेसे केले..स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ती आता अधिक प्रगल्भ झाली..
व्यवस्थापकापासून ते खोलीतील सहकारी मैत्रीणी पर्यंत तिने आपली माया पसरून ठेवली होती.. मिनाचा भाऊ म्हणून मला भाऊबीज..राखी पौर्णिमेला..तिथे मान मिळत होता..तिथल्या महिला..मुली..मलाही भाऊबीजेचे ओवाळत होत्या..मीही भाऊबीज देत होतो..संस्थेच्या भाऊबीज फंडात भर घालत होतो..



दिवाळी..आणि मे महिन्यात तिला सुट्टी मिळे.. घरी कधी कधी तिला त्या वातावरणाचे किती वाईट वाटते याची जाणीव करून देत असेल..नको जायला तिथे..मी तुझ्या घरी राहते..असे म्हणत असे..पण तिच्या पुढील वाटचालीसाठी तिथे रहाणे किती योग्य आहे ते मी तिला सर्वापरी समजावून सांगत होतो.. आणि सुट्टी संपली की तिला परत संस्थेत त्याच त्या वातावरणात सोडत असे..
अखेरपर्यंत तिचा तिथला वावर फारच उत्तम होता..तिचे आयुष्य तिने मेहनत करून घडविले..आईची..आणि वडिलांची माया आणि तिचे तिथले कष्ट सारे आजही डोळ्यासमोर दिसते..
मन भरून येते.. कालवाकालव होते..
बहीण ..संस्थेच्या सुरक्षित भिंतीच्या एका खोलीत आयुष्य काढत होती..पण तिच्यासारख्या अनेक मुली..महिला मला संस्थेत दिसत होत्या.. ज्यांचे कुणी नाही. त्यांचा इथे देव आहे.. आण्णा कर्वे यांनी किती मोलाचे काम करून ठेवले आहे याची प्रचिती तिथे गेल्यानंतर वारंवार दिसत होती..
या माझ्या बहिणीचे अण्णांवर जिवापाड प्रेम होते..रोज सकाळी तू त्यांच्या समाधीपाशी जाऊन त्यांना नमस्कार करीत असे..हा तिचा जणू रोजचा नित्यक्रमच झाला होता..



संस्थेत तिने ३१ वर्ष इमान इतबारे नोकरी केली.. स्वतः चे मन तिथेच घातले..फारशी तक्रार न करता..एकटीने आयुष्य घालविले..स्वतः ला सिद्ध केले..
काम करायची ती पण त्या मानाने खाण्याकडे दुर्लक्ष केले.. चांगले चुंगले खाण्याचा सल्ला दिला..आणूनही दिले..पण त्यांची आवड नाही..आमटी पोळी..आणि तोंडी लावायला भाजी.. केळ सोडून दुसरी फळे खाल्ली नाहीत.. पोटाला चिमटा घेऊन..राहून स्वतःची आबाळ करून घेतली.. मग खाणे कमी केले..
पुढे दाताच्या समस्या वाढल्या..
निवृत्त झाल्यावर तिथेच वृद्धाश्रमात राहण्याचे मान्य केले.. रेडिओ वरील गाणी ऐकणे जास्त आवडायचे तिला..
संगीताचे कान होते.. जुनी मराठी गाणी तिला प्रिय होती.. कधी कधी गुणगुणत असे..तिथे वृद्धाश्रमात झालेल्या समारंभात ती गाणी म्हणती असे.




अगदी हट्टाने दूध घ्यायला लावले..चहा आवडायचा..पण खाण्याची सवय कमी असल्याने आणि चावायला न येता असल्याने तिने स्वतः ला शिक्षा केल्याप्रमाणे खाणे कमी केले.
आई वडिलांचे छत्र हरवले..माझ्यावर फार प्रेम आणि विश्वास.. माझ्या घरात तिला समाधान मिळत असे.. मुलांवर.. नातीवर जीव होता.. तेही तिला जपत.. आपली आत्या त्यांनाही आवडे..
तिचे निरागस हसणे घर प्राण करून जाई..



खरे तर तिने मेहनत केली.. तिला मिळणारा पगार आणि बोनस..वेगळा ठेऊन ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होती.. भाऊबीज आणि राखी पौर्णिमा तिचे आवडीचे सण.. आत दुःख असूनही वरून चेहऱ्यावर समाधानी दिसणारी ही बहीण..माझ्या मनात कायम राहिली..
तिला कधी भौतिक सुख कधीच मिळाले नाही..माझ्या संसारात ती आनंद शोधत होती..तिच्या वहिनीवर म्हणजे माझ्या बायकोवर तिचे प्रेम होते..
अखेरच्या दिवसात घसा साथ देत नव्हता.. अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला.पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला..कॅन्सर झाला. त्याची शस्त्रक्रिया झाली..पण त्यानंतर सहा महिन्यात तिने जगाचा निरोप घेतला..
आयुष्य असेच वाढत राहिले..साठी ओलांडली..पण दुसऱ्यांचे करत ..त्यातच त्यांना सुख देत तिने आपल्या जीवनात अनेक जाणीवेतून भोगणे प्राप्त केले..
अर्थहीन आयुष्यात माणसांना समाधानी ठेवण्यासाठी प्रार्थना केली.. महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा जपली..त्यांचेवर श्रध्दा ठेवली..
कुठल्या समारंभात एका कोपऱ्यात बसून इतरांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघत
माझ्या संसारातील सारे कार्य पाहिले..मला ..हिला.. मुलांना आशीर्वाद दिला..
तृप्त मनाने माझ्यावर विश्वास ठेऊन..प्रसंगी माझ्याशी भांडून तिने आपल्या आयुष्याचा इतिश्री केला..



आज तिच्या आयुष्याची ही कर्मकहाणी ..मलाच सांगावी लागली..कारण मोठ्या दोन बहिणी असूनही या छोट्या भावावर तिने घातलेले मायेचे छत्र मला तिच्या आठवणीत सुरक्षित वाटते..
तिचे आयुष्य शब्दातून उसवताना जाणीवपूर्वक मीही माझ्यातल्या त्या क्षणांचा साक्षी बनतो..मागचे ते दुःखाचे..गरिबीचे डोंगर..पार करून आज मी उभा आहे..त्याचे सारे श्रेय माझे आई वडील..यांच्यानंतर या बहिणीला देतो..










आयुष्य असे उसवून
मी रिकामा होतो..
प्रवास किती तो पुढचा
नव्या क्षितिजी पाहतो..

- subhash vishwanath inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Friday, May 16, 2025

रविंद्र संगीताचे आणि टागोर यांची प्रतिभा सांगणारा कार्यक्रम..!

 रविंद्र संगीत आणि टागोर..यांचे महत्व सांगणारा अद्भुत कार्यक्रम राधा मंगेशकर करतात..तो पुढेही होत रहावा..!



रविंद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठाच्या नियमानुसार सादर करण्यात आलेल्या रवींद्र संगीताच्या लहरी आणि रविंद्र संगीत म्हणून सादर होणारी पारंपारिक गाण्यांची ओळख करून देणारा कार्यक्रम गुरुवारी पुण्यात या संगीताच्या अभ्यासक आणि गायिका राधा मंगेशकर यांनी करून उपस्थित रसिकांना टागोर यांच्या वरील त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून मोहित करून सोडले.
रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेली..स्वरबद्ध.. संगीतबद्ध केलेली गाणी म्हणजे रविंद्र संगीत.. ती सुमारे दोन हजार गाणी आहेत.
माझे हे मन..माझे हे हृदय ..
कदाचित राहील किंवा नाही राहील..
मी स्वतः कदाचित तुझ्या लक्षातही राहणार नाही.
पण मी कुठलाही हेतू न बाळगता
कुठलीही अभिलाषा न ठेवता
मी रोज तुझ्या दारात येईन
आणि तुझ्यासाठी एक गाणे गाऊन जाईन..
अशी सुरवात करून
टागोर यांची गाणी गायला सुरुवात केली..
मोने रोबे की ना रोबे ..
राधा मंगेशकर..यांनी रविंद्र संगीत बरोबरच रविंद्रनाथ टागोरांच्या सर्व साहित्याचा अभ्यास करून त्यावर डॉक्टरेट प्राप्त केली आहे..त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्व प्राप्त होत असते..टागोर यांच्या कविता..कथा..गोष्टी..कादंबऱ्या.. चित्रकार..विचारवंत..





त्यांचे जीवन आणि त्यांनी लिहिलेली गीतांजली यांचे त्या अतिशय मार्मिकपणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे विवेचन करतात तेंव्हा ते नव्याने आपल्या पर्यंत पोहोचते..यातून टागोर यांची प्रतिभा..त्यांचे त्यामागचे विचार याचे दर्शन घडते..
रविंद्र संगीत आणि टागोर यांचे साहित्य दर्शन घडविणारा हा कार्यक्रम राधा मंगेशकर अतिशय गंभीरपणे आणि संगीतातील महत्व लक्षात घेऊन करतात.. यामुळे रविंद्र संगीत आणि टागोर यांचे साहित्यामुळे रसिकांच्या मनात कायम लक्षात राहते.. बंगाली भाषा अतिशय सोपी असून त्याची गोडी लागावी असेच त्यांचे विचार होते.
टागोर साहित्य अभ्यासण्याची ..त्याची खोली कळण्याची उर्मी वाढविणारा कार्यक्रम..!
असा कार्यक्रम फारसा लोकप्रिय होत नाही..त्याला रसिकांची उपस्थिती नसते..तरीही हा एक महत्वाचा सांस्कृतिक मूल्य जपणारा कार्यक्रम आहे.. तो राधा मंगेशकर यांनी यापुढेही केला पाहिजे..आणि मनोरंजनाचे संस्थापक नाना
रायरीकर यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने शिरीष
रायरीकर यांनी खास आयोजित करून रवींद्र संगीत म्हणजे नेमके काय..कसे..याबद्दल उत्सुकता वाढविणारा सादर केला याबद्दल त्यांचेही आभार..




चारुलता.. सत्यजित रे..यांचा चित्रपट..
रविंद्रनाथ टागोर.. यांच्या कथेतील
माणूस..आणि त्याच्या मनातील भावना..यांचे दर्शन घडविणाऱ्या कथा.
संपूर्ण टागोर यांचे साहित्य..त्यातले सोपेपण..
काबुलीवाला..
सौंदर्य म्हणजेच ईश्वर.. महामाया
उपहार..पोस्टमास्टर.. चौकर भाले..
शिक्षा
.कथा....त्याचा सारांश..
राधा मंगेशकर.. यांचा कार्यक्रम रवींद्र संगीत..
विश्वशांती..निकेतन...यांनी रविंद्र संगीताचे नियम केले आहेत..तुम्ही त्या चाली बदलावायच्या नाहीत.. मूळ चाल तशीच रहायला हवी..त्यासाठी टागोर यांनी लिहलेले नोटेशन त्याच पद्धतीने गायचे..हे केलेले ते नियम सांगून आणि आपल्या सादरीकरणात पाळून राधा मंगेशकर यांनी ती गाणी गायली.
म्हणूनच हे रविंद्र संगीत आजही शंभर वर्षे त्याच स्वरसंस्कारात टिकून आहे.
शेई भालो आमारे न होय
तत्त्वज्ञान..टागोर यांचे विचारवंत म्हणून असलेले महत्व
..सौंदर्य प्रधान..निसर्ग..नियती..ईश्वर.. याबद्दल टागोर यांचे साहित्य
आणि कबीर यांच्या काव्याचे इंग्रजी मध्ये भाषांतर साँग्ज ऑफ कबीर..याबद्दल त्या सांगतात..
तोमार होलो सुरू, आमार होलो शारा





टागोर म्हणजे कवी..
गीतांजलीचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाल्याने त्याचे महत्व सगळ्यांना कळाले..म्हणूनच ते टागोर यांचे विचारवंत म्हणून झाला महत्व कळले..त्याचे अनमोल महत्व राधा मंगेशकर अतिशय सुंदर शब्दात वर्णन करून सांगतात..
शोनार तोरी..कविता..





मध्यंतरानंतर..टागोर यांची नाटके
वाल्मिकी प्रतिभा
विसर्जन
डाकघर
रविंद्र नृत्य नाट्य.. त्यातले
चित्रांगदा
शामा
चांडालिका..याबद्दल त्या बोलतात
खनिकेर अतिथी म्हणजे क्षणिक अतिथी..
सुखे आमाय राखबे केनो ..
तुमि मोर पाओ ना पोरिचॉय
ऍकला चॅलो रे... या लोकप्रिय असलेल्या रविंद्र संगीतातील गाण्याने शेवट.. ह्यात बाऊल संगीत..वापरले आहे..हे आहे ईश्वर आराध्येचे गाणे..
आपल्या एकूणच सादरीकरणात ...
- मधु गंधे भरा...
- सोनार तरी
- तुमि रबे निरबे
- आय तोबे सहचरी
या रचनांची निवड केली होती..




कार्यक्रमाची सांगता "ऍकला चॅलो रे.." या अप्रतिम गीताने करून कार्यक्रम एका सुरेख उंचीवर नेला.
कार्यक्रमाची सांगता "ऍकला चॅलो रे.." या अप्रतिम गीताने करून कार्यक्रम एका सुरेख उंचीवर नेला. आयन गफूर यांच्या उत्तम ध्वनिव्यवस्थेने ही रंगत अधिक वाढली..
वाद्यांच्या साथीला डॉ. राजेंद्र दूरकर, विशाल Vishal Gandratwar आणि यश भंडारे यांनी ताल सुरांची बहारदार साथ संगत केल्याने.. प्रॉपर बंगाली संगीत ऐकण्याचा नाद मनात कायम लक्षात राहिला.


- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Monday, April 7, 2025

आप्पासाहेब जळगावकर हार्मोनियम फाउंडेशनच्या वतीने जन्मशताब्दी..!

 

आपा जळगावकर यांच्या वादनात असलेल्या गुणवैशीष्ट्यांबद्दल अधिक अभ्यास व्हावा.. डॉ. विकास कशाळकर वादनामध्ये सलगता असावी लागते ती त्यांच्या वादनात आढळते..हार्मोनियम वादनात त्यांनी जे वेगळे काम केले..त्याचा अभ्यास व्हायला हवा.. कसे, कुठे आणि किती वाजवायचे हे त्यांनी दाखवून दिले.

प्रत्येक गाण्यातली वैशिष्ट्य आत्मसात करून त्यांनी आपल्या वादनातून त्यांनी सर्व घराण्यातील गायकांना साथ केली..असे हार्मोनियम वादक कोणत्या पद्धतीने वाजवित होते यावर संशोधन होणे अपेक्षित आहे, असे मत डॉ. विकास कशाळकर यांनी ज्येष्ठ वपेटी वादक आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त सुरू झालेल्या पहिल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

शुक्रवारी पुण्यात भरत नाट्य मंदिरात आप्पासाहेब जळगावकर हार्मोनियम फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त खास सभा आयोजित केली होती. यावेळी कशाळकर बोलत होते.




आप्पासाहेबांच्या आठवणी.. सांगताना त्यांनी साथ करताना छोटा मोठा कलाकार असे काहीही बघितले नाही.. सगळ्यांबरोबर त्यांनी प्रेमाने वाजविले..असे नृत्य गुरू शमा भाटे यांनी सांगितले.
पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी दिग्गज कलाकारांना साथ करताना ते करताना कार्यक्रम अधिक चांगला कसा होईल हे पाहणारे पेटीवादक आप्पासाहेब जळगावकर..



गाण्यातील सर्व घराण्यावर प्रेम करून त्या त्या घराण्यातले बारकावे त्यांनी आत्मसात केले..सहज वादन.. हार्मोनियमयला नवीन आयाम दिला...प्रतिष्ठा प्राप्त करून दिली..असे गौरवपूर्ण उद्गार काढले.
भरतचे अध्यक्ष आणि तबलावादक पांडुरंग मुखडे...भीमसेन जोशी यांच्या बरोबर ३५ वर्षे साथ करणारे आप्पा जळगावकर यांची आठवण त्यांनी सांगितली.
भीमसेन जोशी यांच्या बरोबर दौरा करून घरी परतल्यावर जी तान पेटीतून निघू शकली नाही त्याचा रियाज करीत असल्याची आठवण मुखडे यांनी सांगितली.
यावेळी मंचावर जळगावकर यांचे शिष्य प्रमोद इनामदार उपस्थित होते. राम कोल्हटकर यांनीही
मंचावर हजेरी लावली.


पेटीला पंख देणारे स्वर गंधर्व.! या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्यावर संशोधन करून डॉक्टरेट मिळविलेले हार्मोनियम वादक डॉ .ऊपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी आप्पांवर तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली.
डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी शैलेश वर्तक यांच्या तबला साथीने आपल्या हार्मोनियम वादनाचे कौशल्य सिद्ध केले..
त्यांनी मियां मल्हार आणि नाट्यगीत सादर केले.





पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने रसिकांना आगळी संगीत मेजवानी मिळाली.
प्रथम सूर साधे..बंदिश आणि साहेला रे..आणि शेवटी पद्मनाभा नारायणा या भजनाने रघुनंदन पणशीकर यांनी रसिकांना तृप्त केले.
त्यांना तबला साथ केली ती .. पांडूरंग मुखडे यांनी तरपेटीची साथ..कुमार करंदीकर यांनी केली होती..
संपूर्ण वर्षभर आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त १२ कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती..कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे संजय गोखले यांनी सांगितले.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

अभिजित पंचभाई गीतरामायण नवीन कलावंतांना शिकविणार..!









स्वये श्री राम प्रभु ऐकती..ने अभिजित पंचभाई सादर केलेल्या विसाव्या वर्षीच्या गीत रामायण कार्यक्रमाची सांगता झाली ती ..गा बाळांनो श्रीरामायण..या भरून टाकणाऱ्या गीताने..
श्रीराम साठे यांनी संत कृपा मार्फत आयोजित केलेल्या गीतरामारणातील गीतांच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन तरुणांनी पहिला आणि दुसरा क्रमांक पटकविला..आणि त्यांच्याच प्रेरणेनी गीतरामायण कार्यक्रम करण्याची प्रेरणा राजेंद्र गलगली आणि अभिजीत पंचभाई यांनी २००५ मध्ये घेतली..आणि तीच परंपरा एक व्रताप्रमाणे पार पाडत असलेले आज त्याचा इतिहास घडवून राम नवमीच्या दिवशी आपल्या संचासह तो साजरा करीत रसिकांना राम कथा काळानुरूप ऐकवत असतात..
आता हेच गीतरामायण नवीन गायकांना शिकविण्याची तयारी अभिजित पंचभाई यांनी रविवारी सादर केलेल्या कार्यक्रमात जाहीरपणे मान्य केली असून तसा त्यांनी रसिक..प्रेक्षकांना पुण्यातील कार्यक्रमात दिला.




यंदा वाल्मिकी गीतरामायणाचे अभ्यासक रवींद्र खरे यांनी या राम कथेचे कालानुरूप विचार सांगत केलेले निरूपण हा या कार्यक्रमातील महत्वाचा भाग ठरला.



यंदा.. संगीतकार मिलिंद गुणे..आणि निरुपणकार रविंद्र खरे यांच्या हस्ते श्री राम प्रतिमेला आणि हनुमंताच्या स्थानाचे पूजन करून पहिले गायन स्वये श्री राम प्रभु ऐकती ने वाल्मीकी रामायण गाण्याला सुरवात केली.
अभिजित पंचभाई, राजेंद्र गलगले..देवयानी सहस्त्रबुद्धे,अमिता घुगरी, माधवी तळणीकर या गायकाबरोबर
दिप्ती कुलकर्णी ,चारूशीला गोसावी, उद्धव कुंभार, आशय पाध्ये ,प्रणव पंचभाई,, तसेच उत्तम ध्वनी प्रदर्शन करून हेमंत..शीतल यांनी कार्यक्रम अधिक आपलासा केला.





अयोध्या मनू निर्मित नगरी
दशरथा घे हे पायस दान
राम जन्मला ग सखे
चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला
स्वयंवर झाले सीतेचे
नकोस नौके परत फिरू
माता तू वैरिणि ..अभिजित
पराधीन आहे जगती..राजेंद्र
मागणे हे एक रामा
आपल्या त्या पादुका..अभिजित




सूड घे त्याचा लंकापती..अमिता घुगरी
मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा.. देवयानी सहस्रबुद्धे
वाली वध ना खल निर्दालन ..राजेंद्र
मज सांग अवस्था दुता रघुनाथची..माधवी तळणीकर
सेतू बंधारे सागरी..अभिजित..राजेंद्र
सुग्रीवा हे साहस असले..राजेंद्र
भूवरी रावणवध झाला..सर्व.. कोरस


शेवटचे गीत..
रघुरायाच्या नगरी जाऊन..गा बाळांनो श्रीरामायण..सादर झाले..
भाव..शब्द..आणि लय..यांची उत्तम तयारी करून सगळ्याच गायकांनी गीतरामायणातील गाणी भावपूर्ण आणि तन्मयतेने सादर केली..
त्याला साथ दिली ती अभिजित जायदे यांच्या पासून सर्वच तयारीच्या साथीदारांनी.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Wednesday, April 2, 2025

आजच्या काळासाठी गीतरामायण महत्त्वाचे का आहे याचे दर्शन



राम तत्वाची मांडणी करून आजच्या काळासाठी गीतरामायण महत्त्वाचे का आहे याचे दर्शन शब्द आणि स्वरांच्या स्वरूपात साकार होते ते अवघ्या आशा श्रीरामार्पण.. या कार्यक्रमात ..!

गीतरामायणाचा आधार घेत राम कथेचा आधार न घेता रामाच्या आयुष्यात घडलेल्या घटनेच्या आधारे राम तत्व मांडण्याची भूमिका घेऊन आजच्या काळातही रामाने आपल्या जगण्यातून जी मूल्ये जपली त्याच्याशी सुसंगत विचार मांडून त्याला योग्य अशी गाणी सादर करून एक वेगळा कार्यक्रम पुण्यात केला तो त्रिदल निर्मिती असलेला ..अवघ्या आशा श्रीरामार्पण ! 

गुढी पाडव्या पाडून रामनवमी पर्यंत अनेकविध गीतरामायणाचे कार्यक्रम सर्वत्र साजरे होत आहेत.. गीतरामायणाचे ही ७० वे वर्ष. म्हणूनच स्नेहल दामले, श्रुती देवस्थळी आणि प्रसन्न बाम यांनी गीतरामायणाचे कोणते वेगळे रूप मनात योजून हा सादर केलेला असेल याची उत्सुकता होती..

आनंद माडगूळकर आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शुभारंभाच्या प्रयोगाचे दीपप्रज्वलन झाले आणि इथे नेहमीपेक्षा आगळे दर्शन होणार असल्याचे दिसून आले..
गीतरामायणाचे विचार नव्याने समाजापुढे आणण्याची प्रेरणा मिळेल असे आनंद माडगुळकर यांनी बोलून दाखविली.
आज बाहेरचा गोंगाट इतका वाढला आहे..की ज्या आत्मस्तानाला समर्थांनी साथ घातली होती त्या आत्मरामाचा आवाजच आपल्याला ऐकू येत नाही . म्हणून आज राम तत्वाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे..असे मौलिक विचार प्रा. मिलिंद जोशी यांनी या प्रसंगी मांडले.

सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल ..टिळक रोड इथे गीतरामायणाचे स्वर ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी करून आलेल्या रसिकांच्या समोर नेहमी इतर कलावंतांच्या गाण्यांना निवेदन करून व्यक्त होणाऱ्या स्नेहल दामले या मंचाच्या मध्यभागी..श्रीरामाच्या छायेत दिसल्या आणि त्यांनी ही राम कथा नसून इथे तुम्हाला राम तत्व लक्षात घेऊन त्यानुसार गीतरामायण ऐकता येईल असे सांगितल्यावर उद्देश नक्की झाला..आणि खरोखरच या कार्यक्रमात आपल्याला राम नक्की वाटेल याची खात्री पटली..


पाचशे वर्षांनी श्रीराम मंदिर अयोध्येत उभे राहिले आणि ज्याच्या नावाने भारताला ओळखले जाते त्या अयोध्या नगरीचे वर्णन करणारे गाणे घेऊन कार्यक्रम सुरू होतो..अभिजीत पंचभाई यांनी अयोध्या नगरीचे गुणगान पुण्यनगरीत माडगूळकरांनी आपल्या शब्दातून प्रसूत केलेल्या गीतातून झाले..हा शुभ योग..!

इथे राम जन्मापासून सुरू होते ती राम तत्वाची मांडणी.. इथेही २०२४ मध्ये अयोध्येत राममंदिरात उभी केलेली दिपवून टाकणारी रामाची मूर्ती..निरूपणकर्त्या स्नेहल दामले यांच्या डोळ्यासमोर उभी राहते..

 


जगण्यात राम केव्हा येईल जेव्हा तुम्ही रामाप्रमाणे सत्वशील..नियम पाळून वागाल..स्नेहल दामले यांनी यातल्या निवडलेल्या प्रत्येक गाण्याला काळाच्या ओघात प्रवेश करत आत्ता कसे तुम्ही आम्ही वागायला हवे याचे बारीक चिमटे काढत पुणेरी पद्धतीने ही रामतत्वे उपस्थित रसिकांच्या मनात ठेवण्याचा प्रयत्न करतात..

कैकयी ही एक वृत्ती आहे.. म्हणून त्यांचे नाव आपण कुणी ठेवत नाही.. रामाचे धैर्य आणि त्यावर ठामपणे व्यक्त होणे..हे ही पाहण्यासारखे आहे..म्हणून इथे " मोडू नका वचनास .." हे गाणे निवडले.. 

रामाला या अयोध्येतून दुसऱ्या तीरावर नेणारे नावाडी करतात त्यात कर्म आहे..तुम्ही आम्ही तुमचे काम मनापासून करीत रहा.. बाकी सरकार पाहून घेईल..आणि मग यात गाणे येते.. जयगंगे जय भागीरथी..

काव्य म्हणून श्रेष्ठ असणारे ..पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ... हे वैश्विक गाणे आहे..प्रत्येक माणसाला लागू होईल असे हे गीत म्हणजे गदिमांचे अजरामर काव्य आहे. जगण्याचे बळ देणारे गीत.

एका हातात सारी दु:ख आणि दुसऱ्या हातात हे सांत्वन गीत ठेवलं तर तराजू बरोबर होईल असे स्नेहल दामले इथे सांगतात..राम तत्व मूल्ये सांगताना इथे गदिमांनी रचलेल्या गीतरामायणातून त्यांचे सिद्धहस्त म्हणून असलेले मोठे काम आपल्या निरूपणात भावपूर्ण रित्या मांडले जाते.

रामाला मानणारे भक्त भुकेजले हवेत..आणि ते चकोर हवेत..आज चकोरा घरी पातली भुकेजली पौर्णिमा..हे सांगण्यासाठीचे धाडस वाल्मिकी आणि गदिमा यांनी केले आहे..असे सांगून इथे धन्य मी शबरी श्रीरामा.. हे शबरीचे गीत येते.

संवादाचे दालन वर्षानुवर्षे न मिळालेल्या अहिल्याचे माणूस बनणे कथा काल्पनिक असू शकते.. पण उद्या ज्याची गरज पडेल त्याला मदत करणे ही भूमिका घेतली गेली असावी असे सांगत त्यांनी पुढचे गीत सुरू केले.. आज मी शाप मुक्त झाले..


सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांनी आपल्या आयुष्यात काही मूल्ये जपणे आवश्यक आहे..आजच्या रामांना ,आपली पत्नी सीता असावी असे वाटते पण त्यांची मात्र राम होण्याची तयारी नसते ..असे असंख्य दाखले देत हा कार्यक्रम आपल्याला यातून जगण्याचे विचार देतो.

रामकथेचे बीज वाल्मिकी यांनी पेरले पण त्याला मराठी भाषेत अधिक रुजवले ते गदिमा आणि बाबूजी या जोडीने.. इथे त्याच गीतरामायणातील वेगळा विचार स्नेहल दामले यांनी अधिक प्रभावी पद्धतीने समजावून दिला.. त्यासाठी वाचक आणि वेधक गाणी त्यांनी इथे घेतली  ..त्याला  आपला असा वेगळा आयाम दिला..त्याबद्दल त्यांचे खरोखर कौतुक केले पाहिजे.

अभिजीत पंचभाईसारखा भावपूर्ण गायक, श्रुती देवस्थळी सारखी मेहनती गायिका..यांनी गाण्यांची केलेली उत्तम तयारी . सुधीर फडके यांनी गदिमांच्या रचनेला दिलेला न्याय..इथे त्याच स्वरभावनेतून ती गाणी साकारून गायकांनी ती अधिक उठावदार सादर करून रसिकांना मोहात पाडले.उद्धव कुंभार सारखा ताल वादक, अमित कुंटे यांच्यासारखा तबला वादक आणि प्रसन्न बाम सारखा अप्रतिम हार्मोनियम वादक साथीला असेल तर कार्यक्रम उंचीवर जाणार हे नक्की असते.

असा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम सादर करून केलेले हे धाडस गीतरामायणावर प्रेम करणारे कोट्यावधी रसिक प्रेक्षक भारावल्या स्थितीत ऐकतील आणि प्रतिसाद देतील याची खात्री आहे.


-- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com